मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कडाक्याचं ऊन पडत असून वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज, शुक्रवारी मुंबई शहरातील काही भागात हलक्या सरी बसरल्या असून त्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत. मुंबई शहरातील भांडुप, नाहूर, कांजूर मार्ग आणि मुलुंड परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता लवकरच मान्सूनचा पाऊस बरसण्याची आशा मुंबईकरांना लागली आहे. आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे दिवसभरात आणखी काही ठिकाणी सरी बसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. तर अनेक राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस तीन जिल्ह्यांना अतितीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे राज्यभरात कुठे ऊन तर कुठे पाऊस असे संमिश्र वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.