नागपूर : विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. भाजप विधीमंडळ गटाच्या बैठकीदरम्यान दरेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली.
विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत भाजपच्या सुजितसिंग ठाकूर, भाई गिरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु या नेत्यांना मागे टाकत दरेकरांनी बाजी मारली आहे. याआधी विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे विरोधीपक्षनेते होते.
प्रविण दरेकर हे सद्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. प्रविण दरेकर हे 2009-2014 या पाच वर्षात मनसेचे आमदार होते. यानंतर 2014 साली त्यांनी भाजपप्रवेश केला होता.
दरम्यान आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.