छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. खुलताबादमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवार व शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मंदिर परिसर व संपूर्ण खुलताबादमध्ये 600 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय खुलताबादच्या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांना शनिवारी मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून खुलताबादमधील औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आहे. राजकीय नेत्यांकडून याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य झाली. नागपूरमध्ये तणाव निर्माण झाल्याने यंदाच्या हनुमान जयंतीला पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हनुमान जयंतीला दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी नुकताच बंदोबस्ताचा आढावा घेतला.
हेही वाचा : आता मुंबईकरांना एकाच कार्डवर प्रवास करता येणार
औरंगजेबाची कबरीवरुन नागपूरात हिंसाचार
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील या संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झालं. काही दिवसांपूर्वी महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठा गट जमला होता. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी गटानेही प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगवेगळं केलं आणि जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कालांतराने हा जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. तसेच एका पोलिस उपाध्यक्षकांवरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामुळे राज्यात वातावरण पेटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.