पनवेलमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट उघड

पनवेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या 5 बांगलादेशींना अटक; अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई, पहलगाम हल्ल्यानंतर पोलिस सतर्क.
पनवेलमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट उघड

पनवेल:  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी सतर्कतेचा भाग म्हणून मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील करंजाडे परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्रे व पासपोर्ट मिळवले होते.

ही कारवाई पनवेल क्राइम ब्रँचच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने केली आहे. PSI सरिता गुदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 4 मे रोजी करंजाडे सेक्टर 6 मधील 'ब्लू क्रेस्ट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी'त छापा टाकण्यात आला. यावेळी दोन पुरुष व तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत या नागरिकांनी कबुली दिली की, काहींनी वैध व्हिसावर भारतात प्रवेश केला होता, परंतु व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते देशातच राहिले. तर उर्वरित आरोपींनी भारत-बांगलादेश सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात घुसखोरी केली होती. हे सर्व जण करंजाडे परिसरात टेलरिंग, रिक्षा चालवणे, मजुरी, ब्युटी पार्लर इ. कामे करत होते, आणि स्थानिकांसारखेच जीवन जगत होते.

हेही वाचा: जलसंधीवर भारताचा पुनर्विचार? पाकिस्तानसाठी धक्का; बागलिहारनंतर आता किशनगंगा धरणावर लक्ष

धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपींनी भारतीय ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र मिळवले होते. यापैकी तिघांनी तर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्टही तयार केले होते. हे सर्व काम एका भारतीय एजंटाच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांमध्ये भारतीय पासपोर्ट कायदा, परदेशी नागरिक कायदा, फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे व वापरणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक खोलात सुरु केला असून आणखी कोणी या जाळ्यात सामील आहे का, याची चौकशी सुरू आहे.

या कारवाईमुळे पनवेल व परिसरातील बेकायदेशीर घुसखोरी, बनावट कागदपत्रे व स्थलांतरितांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. पोलिसांकडून अशा प्रकारच्या आणखी मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version