अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बँकेकडून योग्य उत्तर न मिळाल्यास बँक फोडून टाकेन असा दमच चुरणी गावातील बँक कर्मचाऱ्यांना दिला. बँकेत लोकांना होणारा त्रास आणि गैरसोय पाहून नवनीत राणा यांचा राग अनावर झाला. त्यावर उत्तरं देण्यास बँक कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावर आणखी संतापलेल्या राणा यांनी बँक फोडून टाकण्याचा दमही दिला.
बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात, अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या.
या तक्रारींबाबत माहिती घेण्याकरीता जेव्हा खासदार नवनीत राणा स्वत: मेळघाटमधील ‘चुरणी’ गावातील बँकेत पोहचल्या तेव्हा त्यांना तेथील लोकांनी बँकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली.
खासदार नवनीत राणा मेळघाटातील चुरणी या गावाच्या दौऱ्यावर असताना तेथील बँकेबाहेर लागलेल्या लोकांची रांग पाहून त्या थांबल्या आणि त्यांनी लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
यावेळी खात्यातील जमा रकमेची माहिती घ्यायची असल्यास बँक कर्मचारी दिरंगाई करतात, बँकेतून 1000 रूपये विथड्रॉ करण्यासाठीही चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली.
नवनीत राणांनी याबाबत बँक कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. यामुळे खासदार नवनीत राणांचा राग अनावर झाला.
“पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही तर बँक फोडून टाकेन” असा दमही नवनीत राणा यांनी दिला. शेवटी 5 वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्यानंतरच त्या तिथून निघाल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.