सांगली: वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण डॉक्टरचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने नागपूर आणि सांगली परिसरात शोककळा पसरली आहे. नागपूरच्या शिवाजीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या डॉ. खुशी मूंदडा या सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शल्यचिकित्सा विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. निवासी डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावत असताना घरी परतण्याच्या मार्गावर त्यांच्यावर काळाने घाला घातला.
डॉ. खुशी या सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील स्वतःचा व्यवसाय सांभाळतात, तर आई मानसोपचार समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. तिन्ही भावंडांमध्ये त्या सर्वांत मोठ्या होत्या. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कुशल शल्यचिकित्सक बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीनंतर रुग्णालयातील नियमित कामकाज पूर्ण करून त्या दुचाकीवरून निवासस्थानी परतत होत्या. रात्री अडीचच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावर न थांबता पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघात घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या फॉर्च्युनर कारने पुढे निघालेल्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.