Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर काय, काही जिल्ह्यांना रेड, तर काहींना यलो अलर्ट; जाणून घ्या

महाराष्ट्रात पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर काय, काही जिल्ह्यांना रेड, तर काहींना यलो अलर्ट; जाणून घ्या

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. यामध्येच आता हवामान खात्याने नवा अंदाज जाहीर करत पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना आज, 28 सप्टेंबर रोजी पावसाचा अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ठिकठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

पुणे शहरात आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू असून आज विजांसह पावसाची शक्यता आहे. शिवाजीनगरमध्ये मागील 24 तासांत 14 मिमी पाऊस नोंदला गेला. पुणे घाटमाथा परिसरात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांनी घाटमाथा परिसरात प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

साताऱ्यात पावसाचा जोर कायम

सातारा जिल्ह्यात शनिवारीच 55 मिमी पेक्षा अधिक पाऊस कोसळला. कमाल तापमानही 23 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. पुढील 24 तासांत पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ग्रामीण भागात पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येऊ शकतात.

कोल्हापूर जिल्हा सतर्क

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. हवामान खात्याने आज जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावर मात्र ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे ग्रामीण आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूरात नद्यांचा पूर

सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शनिवारी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. माढा, पंढरपूर, सांगोला, करमाळा, अक्कलकोट या भागात 50 ते 65 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. भीमा आणि सीना नद्यांमध्ये विसर्ग वाढल्याने नद्यांची पातळी सतत वाढत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज यलो अलर्ट असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सांगलीत पाण्याचा विळखा

सांगली शहरात शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले. पेठा आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी आहे.

प्रशासन सतर्क

मुंबई महानगरासह संपूर्ण राज्यातील यंत्रणा अलर्टवर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशी विनंती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1916 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने स्पष्ट केली आहे. घाटमाथ्यावरील रेड आणि ऑरेंज अलर्ट नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि पुरस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version