महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, ३ ते ७ जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, घाटमाथा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान सक्रिय असलेली ऑफ-शोअर ट्रफ आणि वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यातील पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत अधिक प्रभावी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते.
विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांसह होणाऱ्या पावसामुळे झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली परिसरात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. चिपळूण शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याची नोंद झाली असून, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या पश्चिम पट्ट्यातही दीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागला. काही कच्च्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून भात लागवड तसेच खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पूरप्रवण भाग, नदीकाठ आणि डोंगराळ परिसरात राहणाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी. हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेतल्यास संभाव्य अडचणी टाळणे शक्य होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.