Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होणार असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात 15 ते 17 एप्रिलदरम्यान, मध्य महाराष्ट्रात 15 ते 18 एप्रिल, मराठवाड्यात 16 ते 18 एप्रिल आणि विदर्भात 15 ते 19 एप्रिल या कालावधीत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवण्यासोबतच रात्रीही उष्णतेचा त्रास कायम राहणार आहे.
राज्यातील काही भागांमध्ये तापमानाने आधीच उच्चांक गाठला आहे. मालेगावमध्ये गुरुवारी तब्बल 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत.
वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 1 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत उष्णतेशी संबंधित त्रास झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच सुमारे 49 हजारांहून अधिक रुग्णांनी उष्णतेमुळे उपचार घेतले आहेत.
याशिवाय, उष्णतेमुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेक मृत्यूंची नोंद झाली असून, उष्णतेचा दाह हा त्यामागील एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, चक्कर येणे, त्वचारोग आणि डोळ्यांचे विकार वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, ओआरएसचे सेवन करणे, हलके व सैल कपडे घालणे आणि शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे, असा सल्ला देण्यात आला आहे. बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा सनग्लासेसचा वापर करणेही आवश्यक आहे.येत्या काही दिवसांत राज्यात उष्णतेचा प्रकोप वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.