अजय घोडके, प्रतिनिधी
लातूर : शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झालेल्या वादातून परळीच्या मन्सूर अली शेख लायक अली या तरुणाची त्याचाच मित्रांनी लातूरमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची भयानक घटना घडल्यानंतर आता या घटनेचे बीड कनेक्शन समोर आले आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी खालेद शेख उर्फ अल्ताफ पठाण हा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे तसेच वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील हत्येच्या काही क्षण आगोदरचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
मृत मन्सूर अली शेख लायक अली आणि आरोपी खालेद शेख उर्फ अल्ताफ पठाण हे दोघे परळी येथे वाळू विक्रीच्या व्यवसायातील एकमेकांचे स्पर्धक होते. याच व्यवसायाच्या स्पर्धेतून पैशाच्या देवाण-घेवाणीवरून दोघांचे अनेक वेळा टोकाचे वाद झाले होते. बुधवार, 16 सप्टेंबर रोजी रात्री लातूर शहरातील उस्मानपुरा भागात असलेल्या एका बिर्याणीच्या हॉटेलवर दोघेही आपल्या अन्य मित्रांसह जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेलमध्येच दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्याचवेळी आरोपींनी मन्सूरच्या पोटात सुरा खुपसला आणि जखमी केले. तर अन्य आरोपींनी त्याच्या डोक्यावर फरशी घालून भरचौकात मन्सूर आलीची निर्घृण हत्या करून तिथून फरार झाले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी माहिती घेतली असता आरोपी खालेद शेख उर्फ अल्ताफ पठाण हा परळी नगर परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगरसेवक असून धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती व वाल्मिक कराडचा जुना कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत या गुन्ह्यात आरोपी असलेले अल्ताफ खान सरदार खान पठाण, उमर महेबुब शेख हे तिघेही फरार झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.