सोशल मीडियावर झालेली ओळख एका विवाहित महिलेसाठी भयावह अनुभव ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री करून प्रेमाचे आमिष दाखवत एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जलसंपदा विभागातील उपअभियंता वैभव विजय पाटील याच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव पाटील सध्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात कार्यरत आहे. तक्रारदार महिला आणि आरोपीची जुलै 2025 मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. सोशल मीडियावरील संवादानंतर दोघांमध्ये बोलणे वाढले आणि मैत्री अधिक घट्ट झाली.
तक्रारीनुसार, 16 जुलै रोजी आरोपीने महिलेला कॉफी पिण्याच्या बहाण्याने भेटीस बोलावले. त्यानंतर आलिशान कारमध्ये फिरायला नेले. याच दरम्यान व्हॉट्सअॅपवरील चॅट महिलेच्या पतीला पाठवण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप करण्यात आला आहे.महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने या प्रकाराचे चित्रीकरणही केले होते. ते व्हायरल करण्याची धमकी देत पुढील काही महिन्यांत शहरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार 25 जुलै ते 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव पाटील याच्याविरोधात बलात्कारासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.