मुंबई: इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वाणिज्य विषयाची प्राथमिक माहिती शालेय पातळीवर मिळू शकते. शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषय जोडण्याचा प्रस्ताव दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI – The Institute of Chartered Accountants of India) यांनी राज्याच्या शिक्षण विभागाला सादर केला आहे. शिक्षण विभागाने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत, आवश्यक बदलांसाठी तज्ज्ञ सनदी लेखापालांची एक समिती नियुक्त करण्याचे संकेत दिले आहेत.
ICAI च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC – Western India Regional Council) च्या प्रतिनिधींनी पुण्यातील विविध सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रस्तावावर चर्चा केली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत WIRC चे अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी या उपक्रमाची माहिती दिली. या वेळी ICAI पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, खजिनदार सीए नेहा फडके सीए रेखा धामणकर, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे उपस्थित होते.
केतन सैय्या यांनी सांगितले की, वाणिज्य शाखेत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना या संधींची माहिती लहान वयात मिळावी म्हणून पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात वाणिज्याशी संबंधित विषयांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT – Maharashtra State Council of Educational Research and Training) चे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेण्यात आली. त्यांनी तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना दिली आहे.
ICAIकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. सीए बनू इच्छिणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी 500 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही अटीशिवाय ही शिष्यवृत्ती मिळू शकते. सीए अभ्यासक्रमात काळानुरूप आवश्यक बदल केले जातात. हा अभ्यासक्रम आव्हानात्मक असला तरी विद्यार्थ्यांना वर्षातून तीन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळते. अभ्यासक्रमातील प्रत्येक सुधारणा विद्यार्थीकेंद्रित आणि व्यवसायाभिमुख असेल, याची काळजी घेतली जाते, असे ICAI पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.