Hingoli Earthquake: हिंगोली पुन्हा हादरलं! 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Hingoli Earthquake: हिंगोली पुन्हा हादरलं! 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण परिसरात भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 इतकी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसगव्हाण परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. धक्का जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. काही ठिकाणी काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Weather Update: पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा! पुढील 24 तास तुफान पाऊस; 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे सौम्य धक्के वारंवार जाणवत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण कायम आहे. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 36 वेळा भूकंपाची नोंद झाली आहे. यामधील सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप 4.6 रिश्टर स्केलचा होता. त्यामुळे या भागातील भूकंपीय हालचालींबाबत तज्ज्ञांकडून सातत्याने अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वारंवार होणाऱ्या भूकंपांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भूकंपाच्या कारणांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राज्य शासनाकडे संशोधनाचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या भागातील भूकंपीय हालचालींचे स्वरूप, त्यामागील कारणे आणि भविष्यातील संभाव्य धोके यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.

हेही वाचा: Dahi Handi 2026, Govinda Insurance: दहीहंडीपूर्वी गोविंदांसाठी मोठी खुशखबर! तब्बल 2 लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; सरकारचा मोठा निर्णय=

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाचा धक्का जाणवल्यास घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे, जुन्या व कमकुवत इमारतींपासून दूर राहणे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version