Gold- Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींना सोमवारी अचानक ब्रेक लागला. बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, तर चांदीच्या किमतीतही हजारो रुपयांची घसरण नोंदवली गेली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असताना खरेदीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. अमेरिकेतील रोजगारवाढीचे सकारात्मक आकडे समोर आल्यानंतर डॉलर मजबूत झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकन ट्रेझरी यिल्ड्समध्येही वाढ झाली. त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक लवकर व्याजदर कमी करेल, ही अपेक्षा कमी झाली आहे. या घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्यावर दबाव वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोमवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या वायद्यात मोठी घसरण नोंदवली गेली. जुलै महिन्याच्या सोन्याच्या करारात सुमारे १,८०० रुपयांहून अधिक घट झाली. चांदीच्या वायदा दरातही मोठा फटका बसला असून किंमत तब्बल सहा हजार रुपयांपेक्षा जास्त खाली आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील तेजीला मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतील सराफा बाजारातही या घसरणीचे पडसाद उमटले. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीची तयारी करणाऱ्यांसाठी ही संधी मानली जात आहे.
जागतिक स्तरावर मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाचाही बाजारावर परिणाम होत आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाईबाबत चिंता निर्माण झाली आहे. परिणामी जागतिक आर्थिक धोरणांबाबत अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होत आहे.
गेल्या आठवड्यातही सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरणीचा कल दिसून आला होता. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील परिस्थिती आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवर पुढील काही दिवस सोन्या-चांदीची दिशा अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
सध्या मात्र सोनं आणि चांदीच्या घसरलेल्या किमतींमुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. किंमती आणखी खाली येतील की पुन्हा वाढीचा मार्ग पकडतील, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.