डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु असताना महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढतो आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री हुडहुडी भरवणारा गारठा, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव सध्या राज्यातील जनता घेत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठला आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
हेही वाचा- IND vs SL Women's T20 : स्मृती-शफालीचा जागतिक विक्रम! T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'ही' कामगिरी करणारी पहिली जोडी
याचपार्श्वभूमिवर राज्यातील निफाड, धुळे, अहिल्यानगर आणि परभणी या शहरांतील किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात आलं असून पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव टिकून आहे. दरम्यान कोणत्या ठिकाणी किमान आणि कमाल तापमान कशाप्रकारे असेल ते जाणून घ्या.. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे आणि रात्री सौम्य गारवा राहणार असून मुंबईतील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके राहणार असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे शहरात सकाळच्या सुमारास धुक्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुण्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
त्याचसोबत मराठवाडा विभागात हवामानात थंडगार वातावरण कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असून किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्याची शक्यता आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी आणि रात्री थंडीचा जोर अधिक जाणवणार आहे. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत असून नाशिकमधील निफाड, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान 10 अंशांच्या खाली घसरलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या भागात कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातही थंडीची तीव्रता जाणवत असून नागपूर येथे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील काही ठिकाणी थंडीचा कडाका जाणवत असताना, तर काही भागांत तुलनेने सौम्य थंडी जाणवत आहे. या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
किमान तापमान आणि कमाल तापमान म्हणजे काय?
किमान तापमान आणि कमाल तापमान यात फरक आहे. किमान तापमान हे एखाद्या ठिकाणचे सर्वात कमी तापमान दर्शवते. तर हे तापमान दिवसाच्या कमाल तापमानाच्या विरुद्ध असते. किमान तापमान हे सहसा रात्री किंवा पहाटेच्या वेळी असते. तर दुसरीकडे कमाल तापमान हे एखाद्या ठिकाणचे सर्वाधिक जास्त तापमान दर्शवते. हे सहसा सहसा दुपारच्या वेळी असते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.