komal mane
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून शिंदे सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. यावेळी त्यांनी कृषीमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अब्दुल सत्तार आणि दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना कृषीमंत्रीपद मिळाल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला असे पवार म्हणाले.
राज्यभरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरु आहेत, क्रेनने हार घातले जात आहेत. असे सत्कार न करता शांतपणे घ्या अशी सूचना देणं अपेक्षित होतं. शेतकरी संकटात असताना त्याच्या मागे उभा राहणं गरजेचे होते. यातूनच शेतकऱ्यांना बळ मिळते. २००३ च्या दुष्काळात आपल्याकडे पाऊस पडत नव्हता. तेव्हा कृत्रिम पावसाचाही प्रयत्न आम्ही केला. तुमचे लोक क्रेनने हार घालून घेतात, अजून शेतकरी अडचणीत आहे, हे वागणं बरं नाही, असे म्हणत अजित पवारांनी शिंदे गटातील नेत्यांना खडसावले आहे.
आता राज्य सरकारने सोयाबीन आणि कापसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त १३५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, सोयाबीनचा प्रतिएकर खर्च ११७०० रुपये, तर कापसासाठी प्रतिएकर ११५०० रुपयांचा खर्च येतो. त्याच्यात नांगरणी, पाच मारणे, रासायनिक खतं, सारे काढणे, कीटकनाशक, मजुरी सगळ्याप्रकारचा खर्च मिळून कापूस आणि सोयाबीनसाठी प्रतिएकरी सरासरी ११५०० रुपयांचा खर्च येतो. पण राज्य सरकारने प्रतिहेक्टरी केवळ १३५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. एवढ्यात शेतकऱ्यांचे कसे भागणार, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.