मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट इथं शिंदे गटाच्या आमदारांची बैठकी पार पडली. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. या बैठकीत शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय दिला आहे. शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र शिंदे गटाने हात लावलेला नाही.
दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही वेळेपूर्वीच पक्ष विरोधी कारवाया केल्याने रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर लगेचच शिंदे गटाने या दोघांना नेतेपद दिलं आहे.
याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजधानी दिल्लीत जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.