मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई लोकलमध्ये अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान मुसळधार पावसादरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादावरून मयंक लोहार याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. दरम्यान लोकल गाडीत 22 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली आहे. रोशन सुवर्ण असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस मिळून अधिक तपास करत आहेत.
लोकलमधील हत्येप्रकरणी पोलीस सूत्रांकडून आरोपीच्या जबाबातील तपशील समोर आली असून, आरोपी रोशन सुवर्णाने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुवर्णा दिवसभर मद्यप्राशन केल्यानंतर अंधेरीहून लोकलने घरी निघाला होता. पावसाचे पाणी डब्यात येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून त्याचा मयंक लोहारसोबत वाद झाल्याचा दावा त्याने केला. मृत मयंक लोहार आणि आरोपी रोशन सुवर्णामध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली.
वादादरम्यान मयंकने आरोपीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोपीने दावा केला. त्याचसोबत ट्रेनमध्ये असलेल्या इतर काही प्रवाशांनीही आरोपीला मारहाण केल्याचे आरोपीने जबाबात म्हटले आहे. त्याच संतापातून आरोपीने बॅगेतील चाकू काढून मयंकच्या छाती व पोटावर वार केले, ज्यात मयंकचा मृत्यू झाला. त्यानंतर बोरिवली स्थानकाजवळ ट्रेन मंदावताच आरोपीने उडी मारून पलायन केले. तसेच हत्येसाठी वापरलेला चाकू सबवेमध्ये फेकून दिल्याचे आरोपीने कबूल आहे. यावेळी त्याने मित्राकडून दोन चाकू घेतल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. आरोपीच्या जबाबाची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
तर दुसरीकडे फाशी द्या नाहीतर एनकाउंटर करा… लोकलमध्ये हत्या झालेल्या मयंक लोहारचा भाऊ मेहुल लोहारने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे. लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वदावरून मयंकची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा अटकेत असून रोशनला फाशी किंवा एनकोऊंटर करण्याची मागणी मयंकच्या भावाकडून करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.