Bhumika Natak: रंगभूमीवर गाजलेल्या ‘भूमिका’चा मोठा मान! सचिन खेडेकरांच्या नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

गेल्या वर्षभरात रंगभूमीवर गाजलेल्या ‘भूमिका’ या मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
Bhumika Natak: रंगभूमीवर गाजलेल्या ‘भूमिका’चा मोठा मान! सचिन खेडेकरांच्या नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

मराठी रंगभूमीवर गेल्या काही वर्षांत प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड दाद मिळवलेल्या ‘भूमिका’ या नाटकाला आता आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. लेखक क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाजलेल्या नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. समकालीन वास्तव, मानवी मूल्ये आणि कलाकाराच्या मानसिक संघर्षाला प्रभावीपणे स्पर्श करणाऱ्या या नाटकाला मिळालेल्या या मानामुळे रंगभूमी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

‘भूमिका’ हे नाटक केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले नाही, तर आशय, सादरीकरण आणि विचारांची खोली यामुळेही प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले. आधुनिक काळातील अस्थिर सामाजिक परिस्थिती, व्यक्तीची ओळख, नैतिक मूल्ये आणि कलाकाराच्या आयुष्यातील अंतर्गत संघर्ष या सगळ्या गोष्टी नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळेच मराठी अभ्यास मंडळाने हे नाटक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Usha Chavan: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी परत केले शासकीय पुरस्कार; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

या नाटकातून अभिनेते सचिन खेडेकर यांनी तब्बल 21 वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन केले. त्यांच्या अभिनयाची या नाटकात विशेष चर्चा झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाटकात अभिनय आणि वास्तव यांच्यामधली सीमारेषा किती धूसर होऊ शकते, याचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांना मिळतो. कलाकाराच्या मनात सुरू असलेली घालमेल आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न नाटकात अत्यंत संवेदनशील पद्धतीने मांडले आहेत.

‘भूमिका’ने अल्पावधीतच रंगभूमीवर मोठं यश मिळवलं. अवघ्या एका वर्षात या नाटकाचे 125 प्रयोग पूर्ण झाले आहेत. विविध विभागांमध्ये या नाटकाला 15 प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले आहेत. नुकताच या नाटकाला ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर सन्मान’ देखील जाहीर करण्यात आला. त्यामुळे ‘भूमिका’ हे आधुनिक मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचं नाटक म्हणून पाहिलं जात आहे.

या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले होते. तसेच अनेक मान्यवरांनी या नाटकाचं कौतुक केलं आहे. यात प्रकाश आंबेडकर, परेश रावल, विकास दिव्यकीर्ती, आयपीएस पानोज कुमार शर्मा, आशुतोष गोवारीकर, कुमार केतकर आणि फिरोज अब्बास खान यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

हेही वाचा: मनोरंजनसृष्टीवर शोककळा! फिरायला म्हणून गेले अन् परतलेच नाहीत, प्रसिद्ध निर्मात्याने नदीत उडी मारून संपवलं आयुष्य

नाटकातील कलाकारांची फळीही तितकीच ताकदीची आहे. समिधा गुरु, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर आणि सचिन खेडेकर यांच्या अभिनयामुळे नाटकाला वेगळी उंची मिळाली आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि पात्ररचना यांचा सुंदर मिलाफ या नाटकात पाहायला मिळतो.

विशेष म्हणजे, ‘भूमिका’च्या यशानंतर आता या नाटकाला मुंबईतील प्रतिष्ठित नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे प्रयोगासाठी निमंत्रण मिळाले आहे. मराठी रंगभूमीसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब मानली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version