सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महादेवगड पॉईंट परिसरात घडलेल्या या अपघातामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळी पर्यटनादरम्यान सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मृत पर्यटकाची ओळख डॉ. आयुब सय्यद (वय 45, रा. जत्राट, निपाणी, बेळगाव) अशी झाली आहे. ते आपल्या मित्रमंडळीसोबत आंबोली येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. दिवसभर विविध पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते महादेवगड पॉईंट परिसरात गेले होते. याच ठिकाणी दुर्दैवी घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले रेलिंग ओलांडल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि ते सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळले. जवळच असलेल्या एका स्थानिक विक्रेत्याने ही घटना पाहताच तातडीने त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आंबोलीतील सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने त्वरित शोधमोहीम सुरू केली. मात्र, परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके, निसरडे कडे आणि वाढता अंधार यामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
प्रतिकूल परिस्थितीमुळे रात्री शोधमोहीम मर्यादित ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा सकाळी बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर सलग साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमला दरीतून डॉ. सय्यद यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या मोहिमेत पोलीस, रेस्क्यू पथक आणि स्थानिक स्वयंसेवकांनी समन्वयाने काम केले.
या घटनेनंतर महादेवगड पॉईंटसह धोकादायक पर्यटनस्थळी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात दाट धुके, निसरडे कडे आणि वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले रेलिंग किंवा बंदिस्त भाग ओलांडू नयेत, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरवर्षी आंबोलीत हजारो पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येतात. मात्र, निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्दैवी घटना घडू शकतात. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेतानाच स्वतःची आणि सोबतच्या व्यक्तींची सुरक्षितता जपणे अत्यंत आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.