मुंबई लोकलमध्ये नुकतचं लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाले. आरोपीने 22 वर्षीय तरुणाच्या पोटात चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. यानंतर माटूंगा येथे देखील धक्का लागून फोन खाली पडल्याच्या कारणाने एका अद्यात व्यक्तीने 35 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला.
मुंबईतील या दोन घटना ताज्या असताना पुन्हा लोकलमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. पनवेल-सीएसएमटी लोकल ट्रेनमधील एका मद्यधुंद व्यक्तीचा सहप्रवाशांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मद्यधुंद प्रवाश्याने लोकलच्या डब्यात इतर प्रवाशांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली आहे.
“मी आधीच चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर आहे, यानंतर पुढचा नंबर तुझाच आहे. कर ज्याला जिथं तक्रार करायची आहे… बघ काय होईल?” अशी उघड धमकी या मद्य धुंद इसमाने दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. या लोकलच्या डब्यात काही दिव्यांग प्रवासीसुद्धा होते. या प्रकरणानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.
सदर घटना पनवेल सीएसएमटी लोकल गोवंडी येथे असताना घडल्याचे समोर आले आहे. एका तरुणावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, हार्बर मार्गावरील या नव्या व्हिडिओमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर विडिओ वायरल झाल्यावर आता रेल्वे पोलीसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. दरम्यान लोकलमधील वाद, मारामारी सततच्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.