Rajgarh News : राजगडावर पर्यटकाचा भीषण अपघात; 50 फूट दरीत घसरलेल्या युवकाला दोन तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर जीवदान

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा चुकीच्या वाटेने गेल्यामुळे भीषण अपघात झाला.
Rajgarh News : राजगडावर पर्यटकाचा भीषण अपघात; 50 फूट दरीत घसरलेल्या युवकाला दोन तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर जीवदान

प्रीतम पुरोहित, प्रतिनिधी

नसरापूर : राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा चुकीच्या वाटेने गेल्यामुळे भीषण अपघात झाला. जळगाव येथील अविनाश श्रावण बागुल (वय 25) हा युवक आपल्या कुटुंबासोबत राजगड दर्शनासाठी आला होता. बालेकिल्ल्याकडे जात असताना मुख्य रहदारीचा मार्ग सोडून तो चुकून दुसऱ्या पायवाटेने गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत घसरत गेला. सुदैवाने खाली असलेल्या एका मोठ्या झाडाला तो अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात त्याच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले असून मान व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. युवक दरीत अडकल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत तब्बल दोन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर रेस्क्यू पथकाने युवकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याला पोलीस प्रशासन व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.

हेही वाचा : Ganpatipule Drowning Incident: गणपतीपुळे समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; 5 पर्यटक बुडाले, तरुणांचा युद्धपातळीवर शोध सुरू

या थरारक बचाव मोहिमेत तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, योगेश गोपी, वैभव भोसले, दिलीप तळेकर, अनिल रेणुसे आणि विशाल पिलावरे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच प्रतीक सावंत, रोहित खबाले या पर्यटकांनी आणि पोलीस पाटील सारिका दरडीघे यांनीही बचावकार्यात महत्त्वाची मदत केली.

राजगडावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र अधिकृत मार्ग सोडून धोकादायक पायवाटांचा वापर केल्यास अशा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांनी केवळ अधिकृत मार्गानेच प्रवास करावा आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version