महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये 11 जुलै शनिवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांकडून लुटमारीचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 16587 यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस शनिवारी पहाटे 2.49 ते 4.03 या कालावधीत तब्बल 74 मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती.
याच संधीचा फायदा घेत चार ते सहा जणांच्या टोळीने एस-4, एस-6 आणि एस-7 या डब्यांमध्ये घुसून दरोडेखोरांकडून लुटमारी करण्यात आली. यावेळी दरोडेखोरांनी महिलांसह प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. यात दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले.
विशेष म्हणजे महिलांनाही लक्ष्य करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने गस्त वाढवून कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या प्रकरणानंतर रेल्वे स्थानके आणि रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.