बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर तालुक्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सात लाख रुपये घेऊन बेकायदेशीररित्या विवाह लावण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. वडील, सावत्र आई आणि घरातील इतर नातेवाईकांनी बळजबरीने हा विवाह केला मी विरोध करत होते तर मला मारहाण केली असा आरोपही केला आहे. यासंदर्भात महिला बालकल्याणकडे तक्रार दाखल केली असून बालविवाह झालेल्या व्हिडिओ पुरावे दिले आहे.
शिरूर तालुक्यातील मांगेवाडी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 11 जून 2026 रोजी आहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथे कथितरित्या बालविवाह लावण्यात आल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. तक्रारीनुसार, मुलीच्या वडिलांसह सावत्र आई आणि इतर नातेवाईकांनी संगनमत करून मुलीचा विवाह लावला. तसेच मुलाच्या कुटुंबाकडून सात लाख रुपये घेऊन हा विवाह करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
मुलीची जन्मतारीख 15 जानेवारी 2011 असल्याचा दावा करत, विवाहाच्या वेळी ती अल्पवयीन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या आईने केली आहे. याप्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप तक्रारदारांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी पोलीसचे कर्मचारी, बाल विकास कार्यालयाचे कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर करून या बालविवाह संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही तर येथे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला .या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बालविवाहाला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधींवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बालविवाहाचे धक्कादायक वास्तव समोर आले असून चक्क पंधरा वर्षाच्या मुलीची सात लाख रुपयांमध्ये बोली लावून विवाह केला जात असेल तर अत्यंत धक्कादायक आहे. या विरोधात कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.