अलिबाग तालुक्यातील ताजपुर येथे दरड कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरडीमुळे पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे थोडेफार नुकसान झाले आहे. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील आणि गट विकास अधिकारी यांनी गावाला भेट देवून दरडीची पाहणी केली. जवळ पास १०० घरांची वस्ती असलेल्या डोंगरावरील या गावाला दरडींचा धोका कायम आहे. त्यामुळं इथल्या २९ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. शनिवारी पहाटेच्या दरम्यान ताजपूर येथील डोंगरभागात दरड कोसळली. ही बाब सकाळी तेथील स्थानिकांच्या लक्षात आली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, गटविकास अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, रेवदंड्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आदींनी धाव घेतली. परिसराची पाहणी केली. डोंगरावर असलेल्या पाण्याच्या झऱ्यामुळे माती ढासळून खाली आहे.
ही माती ताजपूर येथील गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर कोसळली. बाजूला असलेल्या विहिरीतही मातीचा ढिगारा साचला. त्यामुळे टाकीसह विहिरीचेही नुकसान झाले आहे. पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. या परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.