ठाण्यातील उद्धव गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद सगळीकडे चांगलेच उमटले आहेत. या घटनेनंतर काल उद्धव गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच रोशनी शिंदे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. यानंतर आता रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. फेसबुक या समाजमाध्यमावर पोस्ट केल्याचा राग धरून रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
दरम्यान, महिला आयोगाच्या आदेशानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन अहवाल सादर केला. त्यानंतर आज संध्याकाळी महिला आयोग एक पत्रक काढून यावर आपली भूमिका मांडणार आहे. तसेच या अहवालात सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नसल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.