CDSCO New Guidelines: डोकेदुखी किंवा तापाची गोळी ठरू शकते प्राणघातक; केंद्र सरकारचा मोठा इशारा

पेनकिलर किंवा अँटिबायोटिक्सचा दीर्घकाळ, अति किंवा वारंवार होणारा वापर क्रॉनिक किडनी डिसीज तसेच लिव्हर निकामी होण्याचे मुख्य कारण ठरू शकते, असे नियामकाने स्पष्ट केले आहे.
CDSCO painkillers antibiotics advisory 2026
डोकेदुखी किंवा तापाची गोळी ठरू शकते प्राणघातक

CDSCO New Guidelines: भारतातील सर्वोच्च औषध नियामक संस्था ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (CDSCO) ने वेदनाशामक (पेनकिलर) आणि प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) यांच्या अनियंत्रित सेवनाबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. पेनकिलर किंवा अँटिबायोटिक्सचा दीर्घकाळ, अति किंवा वारंवार होणारा वापर क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) तसेच लिव्हर निकामी होण्याचे मुख्य कारण ठरू शकते, असे नियामकाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात 21 सप्टेंबर रोजी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांच्या स्वाक्षरीने देशभरातील सर्व वैद्यकीय अधिकारी, औषध विक्रेते आणि नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

साध्या सर्दी-तापासाठी स्वमनाने औषधे घेणे धोक्याचे

सामान्यतः विषाणूजन्य संसर्गामध्ये (वायरल इन्फेक्शन) अँटिबायोटिक्सची अजिबात गरज नसते. मात्र, घरच्या घरी परस्पर पेनकिलर किंवा अँटिबायोटिक्स घेण्याची चुकीची सवय नागरिकांमध्ये दिसून येते. या पार्श्वभूमीवर, CDSCO ने सर्व केमिस्ट आणि औषध दुकानदारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ‘ड्रग्ज रूल्स 1945’ मधील शेड्युल H आणि शेड्युल H1 अंतर्गत येणारी कोणतीही औषधे नोंदणीकृत डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) विकली जाऊ नयेत. अशा औषधांच्या स्वमनाने केल्या जाणाऱ्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा – UPI Payment: खात्यात ‘झिरो बॅलन्स’ पण तरीही Payment Successful! नेमकी पद्धत काय?

डॉक्टरांना कमीत कमी डोस देण्याचे निर्देश; रुग्णांनी परस्पर औषधे घेणे टाळावे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तींमध्येही या औषधांच्या गैरवापरामुळे गंभीर ॲलर्जी किंवा अवयव निकामी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांचे वय, प्रकृती आणि आधीचे आजार लक्षात घेऊन आवश्यक असल्यास कमीत कमी कालावधीसाठी कमी डोस द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः ज्यांना आधीपासूनच मूत्रपिंडाचा विकार आहे, त्यांनी पेनकिलर घेण्यापूर्वी डॉक्टरांना कल्पना देणे अनिवार्य आहे. सर्वसामान्य नागरिकांनी वारंवार होणारी डोकेदुखी, अंगदुखी किंवा तापावर स्वतःच्या मनाने उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version