नुकताच पार पडलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाल्यानंतर आज बँकेच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदाची निवड सर्व सभासदांच्या मते निर्णय घेऊन करण्यात आली. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी ऍड. प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आमदार धिरज देशमुख हे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सर्वात लहान सुपुत्र आहेत. सध्या ते लातूर ग्रामीण मतदार संघाचे विद्यमान आमदार असून यापूर्वी देखील त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाचे धडे घेतले आहेत. आता नव्याने त्यांच्यावर सहकार क्षेत्रातील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी धिरज देशमुख यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार धिरज देशमुख यांनी तर उपाध्यक्षपदासाठी ऍड. प्रमोद जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने सर्व सदस्यांच्या एकमताने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.