मुंबई : दिवाळी आली की मुंबईसह उपनगरात राहत असलेल्या मराठवाड्यातील नोकरदारांच्या मनात एकच प्रश्न कायम असतो,गावी जायचं कसं? कारण या सणांच्या दिवसात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांचे दर हे गगनाला भिडतात. लातून-मुंबईसाठी तर 800 रुपयांचं तिकीट थेट 1500 ते 1800 रुपयांवर जातं असतात. ज्यात सर्वसामान्यांचं बजेट पू्र्णपणे कोलमडतं. मात्र, यंदा या चिंतेतून सर्वसामान्य नागरिकांची सुटका होणार आहे.
दिवाळी प्रवास होणार स्वस्त आणि सोपा
प्रवाशांची दरवर्षी होणारी हीच अडचण लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. दिवाळी सणानिमित्ताने मुंबईहून थेट लातूरसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई सीएसएमटी-लातूर गाडी क्रमांक 01105 / 01106 ही विशेष एकस्प्रेस 13 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या दरम्यान धावणार आहे. या एक्स्प्रेस गाडीची सेवा दर आठवड्यातून दर मंगळवारी आणि गुरुवार उपलब्ध असणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
मुंबईहून लातूरला जाणारी गाडी क्रमांक 01105 ही मध्यरात्री 12.35 वाजता सुटेल आणि हरंगुळ येथे सकाळी 10.55 वाजता पोहोचेल.तर लातूरला दुपारी 11.40 वाजता पोहोचेल, दुसरीकडे परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01106 ही लातूरहून दुपारी 4.30 वाजता सुटणार असून हरंगुळला संध्याकाळी 4.43 वाजता पोहोचणार आहे. मुंबईत पहाटे 4.10 वाजता दाखल होईल.
या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला लातूरसोबतच शहरालगतच्या हरंगुळ स्टेशनवर देखील थांबा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांचा वेळ तसेच रिक्षाचा खर्च देखील वाचणार आहे. ही गाडी 22 डब्यांची असून यात 19 स्लीपर, 4 एसी आणि 5 जनरल कोच असणार आहे. त्यामुळेच ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांनाही मोठा दिलाला मिळणार आहे.