नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील नांगलोई परिसरात लोणचे तयार करणाऱ्या एका कारखान्यात भीषण दुर्घटना घडली असून या घटनेत कारखान्याचे मालक आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी घडलेल्या या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारखान्यात लोणचे साठवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात उतरल्याने श्वास घुटमळून ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणचे बनवणारा हा कारखाना एका निवासी इमारतीच्या तळघरातून चालवला जात होता. कारखान्याचे मालक अनिल हे याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासोबत राहत होते. दरम्यान, कारखान्यातील एका कामगाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अनिल आणि त्यांचा मुलगा नीरज यांना प्राण गमवावे लागले.
पोलीस तपासात असे उघड झाले की कारखान्याच्या आत सुमारे 10 फूट खोल चार ते पाच खड्डे तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये लोणचे साठवून ठेवले जात होते. शनिवारी एका कामगाराने कामासाठी या खड्ड्यांपैकी एका खड्ड्यात प्रवेश केला. मात्र काही वेळातच ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्याचा श्वास घुटमळू लागला आणि तो बेशुद्ध पडला.
कामगार खाली पडल्याचे लक्षात येताच कारखान्याचे मालक अनिल आणि त्यांचे दोन्ही मुलगे नीरज (32) व संदीप (28) त्याला मदत करण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र त्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे तेही बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, आरडाओरड ऐकून अनिल यांचे भाऊ सुभाष तसेच काही स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी मिळून प्रयत्न करत खड्ड्यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर कामगार आणि संदीप यांना शुद्ध आली. मात्र अनिल आणि त्यांचा मुलगा नीरज यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, खड्ड्यात ऑक्सिजनची कमतरता नेमकी कशामुळे निर्माण झाली तसेच कारखान्यात आवश्यक सुरक्षा नियम पाळले जात होते की नाही, याचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.