नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मनसुख हिरेनची हत्या आणि अँटिलियाजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रदीप शर्माला जामीन दिला. प्रदीप शर्माने त्याच्या विरोधात एकही ठोस पुरावा सादर झालेला नाही असा दावा केला आहे.
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेले वाहन बेवारस स्थितीत आढळले होते. हे वाहन आपणच ठेवले अशी कबुली सचिन वाझेने चौकशी अधिकाऱ्यांसमोर दिली होती. वाझेने अँटिलिया जवळ उभी केलेली गाडी ठाणे येथील रहिवासी मनसुख हिरेन याच्या मालकीची होती. ही गाडी वाझेने काही दिवसांसाठी हिरेनकडून घेतली होती. नंतर ५ मार्च २०२१ रोजी मनसुख हिरेन याचा मृतदेह ठाणे जिल्ह्यात खाडी परिसरात आढळला होता. या संपूर्ण कटासाठी वाझेला प्रदीप शर्माने सहकार्य केले, असा आरोप एनआयएने केला होता. शर्माला जून २०२१ मध्ये अटक करण्यात आले. नंतर प्रदीप शर्माची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्माला २३ ऑगस्ट २०२३ रोजी जामीन दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.