IPL 2026: आजपासून आयपीएलची धमाकेदार सुरुवात! आरसीबी-सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, पहिल्याच सामन्यात रोमांचक लढत

कमिन्सच्या अनुपस्थितीत युवा स्फोटक फलंदाज इशान किशन हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.
IPL 2026: आजपासून आयपीएलची धमाकेदार सुरुवात! आरसीबी-सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, पहिल्याच सामन्यात रोमांचक लढत

बंगळूर: जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) 19 व्या हंगामाचा बिगुल आज वाजणार आहे. या दिमाखदार स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर ठाकणार आहेत. बंगळूरच्या ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना रंगणार असून, घरच्या मैदानावर विजयाने सुरुवात करण्यासाठी आरसीबीचा संघ सज्ज झाला आहे. 

गेल्या हंगामात कल्पक नेतृत्वाखाली आरसीबीला विजेतेपद मिळवून देणाऱ्या रजत पाटीदारच्या खांद्यावर यंदाही संघाची धुरा आहे. चॅम्पियन संघाचा आत्मविश्वास आणि घरच्या मैदानाचा पाठिंबा यामुळे आरसीबीचे पारडे जड मानले जात आहे.

मात्र, दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादच्या गोटात सुरुवातीलाच चिंतेचे वातावरण आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: एकीकडे घामाच्या धारा, दुसरीकडे विजांचा कडकडाट! राज्यात हवामानात अचानक बदल; पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

कमिन्सच्या अनुपस्थितीत युवा स्फोटक फलंदाज इशान किशन हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. इशानसाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार असून, आयपीएलमध्ये पदार्पण करताना तो हैदराबादचा सर्वात तरुण भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळवणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये केन विल्यमसनने 27 वर्षे 244 दिवसांच्या वयात संघाचे नेतृत्व केले होते, तर इशान आज 27 वर्षे 253 दिवसांच्या वयात ही जबाबदारी पेलणार आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडला विजेतेपद मिळवून दिल्याने इशानच्या नेतृत्वावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

आरसीबीच्या ताफ्यात विराट कोहली, फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या खेळाडूंमुळे फलंदाजीची फळी भक्कम दिसत आहे, तर गोलंदाजीची मदार अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि जेकब डफी यांच्यावर असेल. दुसरीकडे, हैदराबादकडे ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांसारखे 'मॅच विनर' खेळाडू आहेत. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 11.25 कोटींची बोली लागलेला इशान किशन त्याच्या फलंदाजीने आणि चपळ यष्टीरक्षणाने संघाला कशी सुरुवात करून देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हा रोमांचक सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल, तर सात वाजता नाणेफेक (टॉस) होणार आहे. प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर घेता येईल, तर 'जिओहॉटस्टार' अ‍ॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आयपीएलचा हा धमाका क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.  

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संभाव्य प्लेइंग 11: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेविड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, जेकब डफी, मंगेश यादव, भुवनेश्वर कुमार

सनरायझर्स हैदराबाद (SRH) संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, नीतीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स

हेही वाचा: Kokan Ghat Closed: पुणे-कोकण प्रवासाला ‘ब्रेक’; सुरक्षिततेसाठी ‘हा’ जुना घाट सव्वा महिन्यासाठी पूर्णपणे बंद; जाणून घ्या प्रशासनाचे नियोजन आणि पर्यायी मार्ग

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version