Crime News: गुजरातमध्ये समोर आलेल्या एका तिहेरी हत्याकांडाने राज्यभर खळबळ उडवली आहे. पर्यावरणाचे आणि वनरक्षणाचे काम सांभाळणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेच आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंब अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या आरोपीवरच संशयाचा काटा वळला आणि पोलिस तपासाची दिशा पूर्णपणे बदलली.
भावनगर येथे सहाय्यक वनसंरक्षक (ACF) म्हणून कार्यरत असलेला 39 वर्षीय शैलेश खांभला याला या तिहेरी हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही दिवसांच्या सुट्टीसाठी त्याची पत्नी नयना (40), मुलगी प्रिथा (13) आणि मुलगा भाव्य (9) हे सुरत येथून भावनगरमध्ये आले होते. मात्र, काही दिवसानंतर संपूर्ण कुटुंबाचे कोणतेही ठसे न मिळाल्याने नातेवाईक आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा: Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात इरफान मुख्य सूत्रधार; ब्रेनवॉश करायचा आणि…
दरम्यान, कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणारा खांभला पोलिसांना सांगत होता की त्याची पत्नी आणि मुले ऑटोरिक्षात बसून कुठेतरी निघून गेली. या दाव्याची पुष्टी त्याच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षा रक्षकाने केली, असे खांभलाने तक्रारीत नमूद केले होते. मात्र, चौकशीत सुरक्षा रक्षकाने हा दावा सरळ नाकारला. यानंतर खांभलाच्या वर्तनातील विचित्र शांतता, बेफिकिरी आणि विरोधाभासी माहितीमुळे पोलिसांना प्रकरण काहीतरी वेगळे असल्याचा संशय आला.
तपास अधिक खोलवर गेला असता या प्रकरणामागील धक्कादायक कारणांचा उलगडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, खांभलाचे वनविभागात काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्यासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबासोबतचा वाद, पत्नीचा त्याच्याशी सतत चालणारा वाद आणि भावनगरमध्ये एकत्र राहण्याचा तिचा आग्रह यामुळे खांभला अधिकच अस्वस्थ झाला होता. चौकशीत त्याने स्वतःच कबूल केले की वैवाहिक वादांच्या भरात त्याने पत्नी आणि मुलांना उशीने गुदमरवून ठार मारले.
इतकेच नव्हे तर गुन्हा लपवण्यासाठी त्याने पत्नीच्या फोनवरून स्वतःलाच मेसेज पाठवून ती घर सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याचा खोटा नाट्यप्रयोग रचला. फोन एअरप्लेन मोडवर टाकून ठेवत त्याने पोलिसांना चुकीच्या दिशेने फिरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या विधानांमधील विसंगतीमुळे अखेर त्याचा गुन्हा उघड झाला.
तिघांचे मृतदेह त्याने स्वतःच्या अधिकृत निवासस्थानाच्या परिसरातील खड्ड्यात पुरून ठेवले होते. पोलिसांनी शोधमोहीम राबवल्यानंतर हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या सर्व घटनांची खात्री पटली.
या प्रकरणामुळे संपूर्ण गुजरातमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्यांच्यावर जंगल आणि पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी होती, त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या कुटुंबालाच अशा क्रूर पद्धतीने संपवले, ही बाब समाजाला हादरवणारी आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीच्या महिला सहकाऱ्याचा यात कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.