Ketan Agarwal Case: प्रेम चेतनवर, लग्न केतनशी! कुटुंबाला आधीच माहिती होतं अफेअर?; पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघड

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती कुटुंबाला आधीपासूनच असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
Ketan Agarwal Case: प्रेम चेतनवर, लग्न केतनशी! कुटुंबाला आधीच माहिती होतं अफेअर?; पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघड

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत आता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. सिया आणि चेतन यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती तिच्या कुटुंबातील काही सदस्यांना आधीपासूनच असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी महिन्यात एका सामुदायिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान सिया आणि चेतन यांच्यातील जवळीक कुटुंबाच्या लक्षात आली होती. मात्र, या नात्याला कुटुंबाने मान्यता दिली नाही. यामागे दोन्ही कुटुंबांतील आर्थिक स्तरातील मोठा फरक हे प्रमुख कारण असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

हेही वाचा: Ketan Agarwal Murder Case Update: होणाऱ्या पतीला लोहगड कड्यावरून ढकलून देणाऱ्या सियाचा पोलीस कोठडीत माज; पश्चाताप तर लांबच, केली ही मागणी

तपास अधिकाऱ्यांच्या मते, सियाच्या कुटुंबाने चेतनऐवजी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अगरवाल कुटुंबाशी तिचे लग्न ठरवले. यानंतरही सिया आणि चेतन यांच्यातील संपर्क कायम राहिला होता. या नात्यामुळे निर्माण झालेला तणावच अखेरीस हत्येपर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस आता सियाचा भाऊ साहिल याचीही चौकशी करत आहेत. साहिलला या प्रेमसंबंधांची माहिती होती, असे तपासात समोर आले आहे. त्याने ही बाब इतर कुटुंबीयांना सांगितली होती का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिस कोठडीत सिया गोयलने काही धक्कादायक दावे केल्याची माहिती समोर आली आहे. केतन अगरवाल केसांचा पॅच वापरत असल्याने तो आपल्याला पसंत नव्हता, असा दावा तिने चौकशीदरम्यान केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केतनच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

हेही वाचा : Ketan Agrawal Case: '17 कोटींचं लग्न, चार्टर्ड विमानं सगळं खोटं'; सियाच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, 'माझी ऐपत…

केतनचे वडील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "एखादी व्यक्ती आवडत नसेल तर लग्नाला नकार देता येतो. मात्र, त्यासाठी खुनाचा मार्ग स्वीकारणे कधीच योग्य ठरू शकत नाही. केसांचा पॅच हे कोणाच्याही जीव घेण्याचे कारण होऊ शकत नाही."

तपासादरम्यान सियाने आणखी एक महत्त्वाचा दावा केला आहे. लग्न मोडल्यास कुटुंबीय नाराज होतील आणि समाजात बदनामी होईल, अशी भीती तिला होती. त्यामुळे केतनला मार्गातून दूर करणे सोपे वाटल्याचे तिने कथितरित्या सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणामुळे प्रेमसंबंध, कौटुंबिक दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा घातक परिणाम पुन्हा एकदा समोर आला असून, संपूर्ण राज्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version