नवरा-बायकोचं नातं हे विश्वास, समजूतदारपणा आणि प्रेमावर उभं असतं. मात्र गैरसमज वाढून नात्यात छोट्या छोट्या गोष्टींवर होणारी भांडणं पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. असाच एक प्रकार सोलापूरात घडला आहे.
सोलापूर शहरात विवाहित महिलेला पतीने पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात फैजान जावेद शेख या आरोपीने आपल्याच पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं आहे. या घटनेनंतर सोलापूर शहरात खळबळ पसरली आहे. नर्गिस फैजान शेख असे विवाहित महिलेचे नाव असून नर्गिस आणि फैजान या दोघांचा 2024 साली निकाह झाला होता.
या प्रकरणातील आरोपी फैजान जावेद शेख आणि विवाहित महिला नर्गिस फैजान शेख या दोघांमध्ये लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच वाद होऊ लागल्याने दोघेही विभक्त राहत होते. दरम्यान त्यांच्यातील होत असलेल्या तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सतत्याने वाद होत होते. काल बुधवारी रात्री 10 च्या दरम्यान आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरी आला आणि सासूला विश्वासात घेत मला नर्गिस सोबत बोलायचे असल्याने सांगून तिला एका खोलीत घेऊन गेला.
त्यानंतर त्याने त्याच्यासोबत आणेलेले पेट्रोल तिच्या अंगावर टाकून तिला लाईटरने पेटवून तो फरार झाला. घरात आग लागल्याचे पाहून शेजारी आणि कुटुंबियांनी नर्गिसचा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या घटनेदरम्यान नर्गिस फैजान शेख ही सुदैवाने वाचली असून ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर विजापूर नाका पोलिसांनी पाहणी केली असून याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.