Donald Trump on Gaza and Palestines : अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेणार असून तेथील पॅलेस्टीनी नागरिकांचं गाझाबाहेर पुनर्वसन करणार आहे. तसंच, या पॅलेस्टाईनच्या नागरिकांना पुन्हा गाझामध्ये परतण्याचा कोणताही अधिकार नसेल, असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे विकास करण्याचे धक्कादायक विधान केल्यामुळे जगभरात गोंधळ उडाला. गाझा पट्टीसह अरब राष्ट्रांमध्ये या वक्तव्यावर तीव्र नाराजी असतानाच अमेरिकेच्या अनेक मित्रराष्ट्रांनीही या घोषणेला विरोध केला.
हेही वाचा - 'प्रिन्स हॅरीला हाकलणार नाही; तो तर बिचारा आधीच पत्नीपीडित..' डोनाल्ड ट्रम्प यांचं अजब विधान
माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, विस्थापित पॅलेस्टिनींसाठी गाझाबाहेर अनेक पुनर्वसन स्थळे तयार करण्यात येणार आहेत. त्यांना पुन्हा गाझामध्ये येण्याचा अधिकार नसेल. गाझाबाहेर त्यांना खूप चांगली घरे मिळतील. मी त्यांच्यासाठी कायमस्वरूपी घरे बांधणार आहे. ट्रम्प यांनी प्रथम इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत गाझा पट्टीवर ताबा मिळवणार असल्याची त्यांची योजना जाहीर केली होती. अमेरिका गाझा पट्टीवर काम करून नष्ट झालेल्या इमारती दुरुस्त करू. तसंच, असा आर्थिक विकास करू ज्यामुळे परिसरातील लोकांना नोकऱ्या आणि घरे मिळतील.
पॅलेस्टाईनींना स्वीकारण्यास इजिप्त आणि जॉर्डनचा नकार
सुरुवातीला त्यांनी असे सूचित केले होते की पॅलेस्टिनी लोक तिथे राहू शकतात, परंतु त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे आणि आता त्यांना स्थलांतरित केले जाईल असे सुचवले आहे. इजिप्त आणि जॉर्डनने पॅलेस्टिनी निर्वासितांना स्वीकारावे असे आवाहन करणारा हा प्रस्ताव अरब जगताने आणि व्यापक आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठ्या प्रमाणात नाकारला आहे.
हेही वाचा - मेक्सिकोने सोडला सुस्कारा; आयातशुल्क महिनाभर स्थगित, कॅनडा, चीनला दिलासा नाहीच
पॅलेस्टाईनसाठी सुंदर समुदाय
ट्रम्प यांनी ही योजना जाहीर करण्यापूर्वीच नेतन्याहू यांना या योजनेची माहिती देण्यात आली होती, असे वृत्त आहे. फॉक्स मुलाखतीतील ताज्या वृत्तात, ट्रम्प यांनी गाझामध्ये सध्या असलेल्या वीस लाखांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांसाठी “सुंदर समुदाय” निर्माण करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की युद्धक्षेत्रापासून दूर अनेक पुनर्वसन स्थळे तयार करण्यात येणार आहेत. “भविष्यासाठी रिअल इस्टेट विकास म्हणून याचा विचार करता येईल,” असं ते म्हणाले. 'हा जमिनीचा एक सुंदर तुकडा असेल. यासाठी जास्त पैसे खर्च होणार नाहीत', असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अमेरिका गाझा पट्टीचा ताबा घेईल. त्यावर नियंत्रण मिळविले जाईल. तेथील धोकादायक जिवंत बॉम्ब आणि इतर शस्त्रे अमेरिका निकामी करेल. उद्ध्वस्त झालेल्या इमारती पाडून जागा साफ केली जाईल. तेथे आर्थिक विकास, अमर्यादित रोजगारनिर्मिती आणि नागरी प्रकल्पांचा विकास करू, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्याकडून नवीन वादाचा उगम
ग्रीनलँड आणि पनामा ताब्यात घेण्याच्या घोषणेनंतर आता ट्रम्प यांनी नवा वाद छेडला असतानाच आता ‘युद्धग्रस्त गाझा पट्टीवर स्वत:चा अंमल बसवून त्या भागाचा आर्थिक विकास करू. त्यामुळे तेथे अमर्यादित रोजगारनिर्मिती होईल,’ अशी थेट घोषणा ट्रम्प यांनी केली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गाझा पट्टीत सध्या राहत असलेल्या सुमारे 20 लाख पॅलेस्टिनींनी पश्चिम आशियातील इतर देशांत विस्थापित व्हावे, असा अजब सल्लाही ट्रम्प यांनी दिला. मात्र, गाझा पट्टीत कोणाकडे राहू देणार, यावर त्यांनी काही भाष्य केले नाही. ट्रम्प म्हणाले की, ‘पॅलेस्टिनींना अन्य कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते गाझा पट्टीत आहेत. गाझा पट्टी आत्ता पूर्ण उद्ध्वस्त आहे. अगदी प्रत्येक इमारत मोडकळीस आली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाखाली पॅलेस्टिनी राहत आहेत. हे अतिशय धोकादायक आहे. याउलट, ते अतिशय सुंदर घरांत सुरक्षित राहू शकतात.
हेही वाचा - अमेरिकेत 'या' खेळाडूंना महिलांच्या सामन्यांत खेळता येणार नाही; ट्रम्प सरकारचा निर्णय
नेतान्याहू काय म्हणाले
ट्रम्प यांच्या घोषणेवर नेतान्याहू म्हणाले, ‘असे काही झाले, तर मोठा इतिहास घडेल. असे होणे खरेच इष्ट आहे. गाझा पट्टीतून इस्रायलला भविष्यात कधीही धोका नसेल, याची हमी आम्हाला हवी आहे. ट्रम्प यांनी हा विषय अगदी उच्च स्तरावर नेला आहे. दहशतवादाने ग्रस्त भूमीसाठी एक वेगळे भविष्य या निर्णयामुळे असेल. या निर्णयामुळे इतिहास बदलेल.’
ट्रम्प यांचा निषेध
ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा व्यापक निषेध करण्यात आला आहे. पॅलेस्टिनी नेते त्यांच्या हक्कांचा आणि सार्वभौमत्वाचा पूर्णपणे भंग मानतात. या प्रस्तावामुळे गाझामधील आधीच अस्थिर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे, जी ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली लष्करी कारवायांमुळे उद्ध्वस्त झाली आहे.