वॉशिंग्टन : अमेरिकेत आता ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जन्मत:च पुरुष असताना लिंगबदल करुन घेणाऱ्या खेळाडू महिला किंवा मुलींना क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेरिकेत घेण्यात आला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. अशा खेळाडूंना यापुढे महिलांच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.
अलीकडेच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान अल्जेरियाची बॉक्सिंगपटू इमाने खलिफ पदकापर्यंतच्या वाटचालीत वादग्रस्त ठरली होती. इमानेवर जन्मतः पुरुष असताना लिंगबदल करून स्त्री बनल्याचे आरोप करण्यात आले होते. याच कारणाने इटलीच्या अँजली कॅरिनीने इमानेविरुद्ध उपांत्यपूर्व लढत खेळण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे 2023 मध्ये इमानेला लिंग चाचणी देण्यास सांगितल्यानंतर तिने नकार दिल्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते. तेव्हापासून अशा पद्धतीने ट्रान्सजेंडर बनलेल्या खेळाडूंच्या महिला क्रीडा सामन्यांमध्ये सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिका घेत असलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.
हेही वाचा - 'प्रिन्स हॅरीला हाकलणार नाही; तो तर बिचारा आधीच पत्नीपीडित..' डोनाल्ड ट्रम्प यांचं अजब विधान
राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांनी पुरुष किंवा महिला असल्याचे जाहीर करावे आणि तसा पारपत्रांवर स्पष्ट उल्लेख करावा असा व्यापक आदेश जारी केला होता. खेळामध्ये लिंग समानता राखण्याचा आणि लैंगिक छळ रोखण्याची आपली भूमिका ट्रम्प सरकारने स्पष्ट केली. यासंबंधीच्या एका आदेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून हा आदेश सरकारने जारी केला आहे.
ट्रान्स महिलांना खेळांमध्ये सर्वसामान्य महिलांपेक्षा जास्त फायदा मिळतो का?
हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हार्मोनल उपचारानंतरही ट्रान्सजेंडर महिलांना सर्वसाधारण महिलांपेक्षा ताकद आणि वेगात फायदा होत आहे. कारण, केवळ टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये असलेले हार्मोन त्यांच्यातून कमी करण्याच्या थेरपीनंतरही ट्रान्सजेंडर महिलांना पुरुषी शरीररचनेचा फायदा मिळतो. वयात आल्यानंतर त्यांच्या हाडांची घनता वाढते, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि स्नायूंची ताकदही सामान्य महिलांच्या तुलनेत वाढते.
तथापि, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 2024 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, ट्रान्सजेंडर महिलांमध्ये उडी मारण्याची, फुफ्फुसांची क्षमता आणि सामान्य हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्तीमध्ये सामान्य पुरुषांपेक्षा कमी स्तर असू शकतो. मात्र, हे प्रमाण सामान्य महिलांच्या तुलनेत जास्त असण्याची पूर्ण शक्यता आहे. अर्थात याबाबत कोणतीही बाब अद्याप पुराव्यानिशी सिद्ध करता आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही, असे क्रीडा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
'प्रश्न ट्रान्स महिलांना सामान्य महिलांच्या तुलनेत फायदे आहेत का?' असा नसून, 'ट्रान्स महिला आणि महिला क्रीडा स्पर्धेत एकमेकांविरुद्ध योग्य प्रकारे स्पर्धा करू शकतात का?' असा आहे. आणि खरे सांगायचे तर, याचे उत्तर अद्याप निश्चित नाही,' असे ट्रान्सजेंडर असलेल्या क्रीडा शास्त्रज्ञ जोआना हार्पर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - मेक्सिकोने सोडला सुस्कारा; आयातशुल्क महिनाभर स्थगित, कॅनडा, चीनला दिलासा नाहीच
महिला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर काय म्हणतात?
यातील अभ्यासक आणि तज्ज्ञांचे विचार वेगवेगळे आहेत. काही जणांचा असा युक्तिवाद आहे की, महिलांच्या खेळांमध्ये निष्पक्षता राखण्यासाठी अशी बंदी आवश्यक आहे. तर काहींचा असा युक्तिवाद आहे की, ही बंदी अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध अन्याय्यपणे भेदभाव करत आहे.
ट्रान्सजेंडर लोकांसाठीच्या संघटना काय म्हणतात?
ट्रम्प यांच्या या बंदीच्या निर्णयाचा LGBTQ संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध केला आहे. ग्लॅडने (GLAAD) एलजीबीटीक्यू वकिली गटाने ट्रम्प प्रशासनावर महिलांच्या संरक्षणाचा कपटीपणे वापर करून ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप केला आहे.