एका माकडामुळे अख्खा देश अंधारात गेल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रीलंकेत हा प्रकार घडला असून याची जोरदार चर्चा जगभरात होत आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले.
श्रीलंकेत काल रविवारी सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाला. यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार होता. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देशाच्या अनेक भागातून वीज पुरवठा खंडित झाल्या असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. जसजसा वेळ जाऊ लागला, तसतशा तक्रारीची संख्या वाढली. पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येईपर्यंत जवळपास संपूर्ण देशातून तक्रारी दाखल झाल्या. तेव्हा प्रशासनाची एकच धावपळ उडाली. जवळपास ३ तास हा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी श्रीलंकेतील प्रशासन प्रयत्न करत होते.
माकडामुळे वीज पुरवठा खंडीत - श्रीलंकनं ऊर्जामंत्री
वीजपुरवठा खंडीत प्रकरणाबाबत माध्यमांनी श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कुमारा जयकोडी यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी वीज पुरवठा खंडीत झाल्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, “कोलंबोच्या दक्षिण उपनगरांत असलेल्या सेंट्रल पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मर परिसरात एक माकड उड्या मारताना पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आले. त्यामुळे वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला आणि परिणामी वीजपुरवठ्याची केंद्रीय यंत्रणाच बंद झाली. यामुळे देशाच्या जवळपास सर्वच भागात वीजपुरवठा खंडित झाला.”
हेही वाचा - 'हा' देश केळीपासून बनवतो कपडे; जाणून घ्या...
दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली. तब्बल तीन तासांनतर काही भागातील वीज पुरवठा सुरूळीत करण्यात प्रशासनाला यश आले. पण राहिलेल्या अनेक भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला वेळ लागला. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामावर केंद्रिय मंत्री जयकोडी हे जातीने नजर ठेऊन होते. त्यांनी या संदर्भात प्रशासनाला कडक सूचना दिल्या होत्या. अखेरीस अथक प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, २०२२ साली देखील श्रीलंकेच्या अनेक भागात काही महिने वीजपुरवठा बंद होता. त्यावेळी आर्थिक संकटामुळे हा वीज पुरवठा बंद होता. विशेष म्हणजे, त्या काळात पेट्रोल पंपही बंद होते.