मालदीव, ७ मे २०२४, प्रतिनिधी : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जूंनी चीनला मालदीवच्या अधिकारातील हिंदी महासागराच्या क्षेत्रातील समुद्र तळाचे सर्वेक्षण आणि संशोधनाचा हक्क बहाल केला आहे. श्रीलंकेने चीनबाबतचे आपले धोरण काहीसे कडक केल्याने हिंदी महासागरातील वावर तसेच खनिज संशोधनासाठी चीनला मालदीवची आवश्यकता होतीच. मोईज्जूंच्या निवडणुकीतील यशाने चीनचा रस्ता मोकळा झाला आहे. इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटीकडून २०११ मध्येच चीनने खनिज भांडारासाठी सागरी तळाचा शोध घेण्याचा हक्क प्राप्त केलेला आहे. सागरी तळाच्या १० हजार चौकिमी क्षेत्रात पॉलिमेटिलिक सल्फाईडच्या संशोधनासाठी १५ वर्षांचा परवाना चीनला मिळालेला आहे. आता चीन मालदीवच्या सागरी हद्दीत समुद्रतळाशी या खनिजासह सोने, चांदी, शिसे, जस्त आणि तांबेही शोधणार आहे.