अफगाणिस्तान, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांमध्ये एक हजाराहून अधिक घरांचे नुकसान झाले असून २५० हून अधिक जनावरेही दगावल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक मृत्यू पंजाब प्रांतात झाले आहेत.
दोन्ही देशांच्या हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तालिबानच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी सांगितले की, पुरामुळे राजधानी काबूल आणि देशातील इतर अनेक प्रांत प्रभावित झाले आहेत. पुरामुळे जवळपास ८०० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून रस्त्यांचे नुकसान झाले आहे. पश्चिम फराह, हेरात, दक्षिणी झाबुल आणि कंदाहार प्रांतात सर्वाधिक नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांपैकी बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.