Sunday, July 07, 2024 12:02:36 AM

रशियात पुन्हा पुतिन सरकार

रशियात पुन्हा पुतिन सरकार

रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी सुमारे ८८ टक्के मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. सलग पाचव्यांदा पुतिन पुन्हा रशियाची सूत्र हाती घेणार आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सनं वृत्त दिलं आहे की, रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार, व्लादिमीर पुतिन यांनी ८७.९७ टक्के मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला.

राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन १९९९ पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही.

शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय निवडणुका अत्यंत नियंत्रित वातावरणात पार पडल्या. रशियामध्ये युक्रेन युद्धासाठी व्लादिमीर पुतिन यांच्यावर सार्वजनिक टीका करण्याची परवानगी नाही. पुतीन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झालेला. त्यांचे इतर टीकाकार तुरुंगात आहेत. ७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली, ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. तिघांनीही त्याच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणं टाळलं.


सम्बन्धित सामग्री