Tuesday, July 02, 2024 09:18:17 AM

पाकिस्तानमध्ये इमरानचा पक्ष आघाडीवर

पाकिस्तानमध्ये इमरानचा पक्ष आघाडीवर

इस्लामाबाद, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली अर्थात लोकसभेसाठी गुरुवारी मतदान झाले. मतमोजणी गुरुवार संध्याकाळपासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार २५० जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यात सर्वाधिक ९१ जागा जिंकत माजी पंतप्रधान इमरान खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ हा पक्ष आघाडीवर आहे. इमरान खान तुरुंगात असले तरी त्यांच्या पक्षाला पाकिस्तानच्या मतदारांचा भरघोस पाठिंबा आहे. निवडणुकीत जिंकून आलेल्या ३३ अपक्षांपैकी बहुसंख्य अपक्ष उमेदवारांना इमरान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. यामुळे हे उमेदवार इमरान यांच्या पक्षासोबत राहण्याची शक्यता आहे. नवाझ शरिफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ गटाने ७१ जागा जिंकल्या आहेत. बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने ५३ जागा जिंकल्या आहेत. जमीयत उलेमा-ए-इस्लाम - फजल गट यांनी २ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ३४२ जागा आहेत. यापैकी २६६ जागांवर थेट निवडणूक पार पडली. उरलेल्या जागा महिला आणि अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पाकिस्तानमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

     

सम्बन्धित सामग्री