Tuesday, July 02, 2024 09:07:53 AM

रत्नागिरीच्या दाऊदवर कराचीत विषप्रयोग ?

रत्नागिरीच्या दाऊदवर कराचीत विषप्रयोग

इस्लामाबाद, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताला हवा असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्यावर पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथे विषप्रोयग झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी भारत सरकारने दाऊद विरोधात अटक वॉरंट काढले आहे. भारत सरकारच्या विनंतीनरून इंटरपोलने दाऊद विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. वॉरंट आणि नोटीस काढून अनेक वर्ष झाली तरी दाऊदला अटक झालेली नाही. दाऊद आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानमध्ये व्हाईट हाऊस नावाच्या बंगल्यात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणेने दाऊदचा पत्ता मिळवला. पण पाकिस्तान सरकारकडून संरक्षण मिळाल्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणेला दाऊदला अट करणे शक्य होत नव्हते. पण आता दाऊदवर विषप्रोयग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या तब्येतीविषयी कोणतीही माहिती बाहेर येऊ नये यासाठी आयएसआयची धडपड सुरू असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी दिले आहे.

कोण आहे दाऊद इब्राहिम ?

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेला दाऊद पुढे मुंबईत स्थिरावला. तस्करीतून गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकणाऱ्या दाऊदने नंतर ड्रग्जच्या व्यवसायात प्रवेश केला. अटक टाळण्यासाठी तो भारतातून फरार झाला आणि आयएसआयच्या मदतीन पाकिस्तानमध्ये राहू लागला. पाकिस्तानमध्ये असतानाच आयएसआयकडून सूचना मिळाल्यानंतर दाऊदने त्याच्या हस्तकांच्या मदतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.

दाऊदचे सहा भाऊ

सबीर इब्राहिम कासकर, नुरा इब्राहिम कासकर, मुस्तकीन इब्राहिम कासकर, इकबाल कासकर, अनीस इब्राहिम आणि हुमायून इब्राहिम कासकर हे दाऊदचे भाऊ. यापैकी सबीर इब्राहिम कासकर याचा १९८३ - ८४ मध्ये टोळीयुद्धात मृत्यू झाला. सबीरची पत्नी शहनाज आणि त्याची दोन मुलं सिराज आणि शहजाया. यापैकी सिराजचा कोरोना संकट सुरू असताना पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला. सिराजची बहीण शहजाया आणि तिचा पती मोज्जम खान हे पाकिस्तानमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीत दलाल अर्थात रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत आहेत. दाऊदचा आणखी एक भाऊ नुरा इब्राहिम कासकर आणि त्याची पत्नी शफीका या दोघांचा मृत्यू झाला आहे. नुराची दुसरी पत्नी शफिका आणि मुलगी सबा जीवंत आहेत. इकबाल कासकर ठाण्यातील तुरुंगात आहे. इकबालची पत्नी रिझवाना तसेच त्याच्या दोन मुली अयमान आणि हफिसा या हे सर्वजण दुबईत आहेत. इकबाब आणि रिझवाना यांची आणखी दोन मुलं आहेत. यापैकी मुलगा रिझवान मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. मुलगी झाला स्पेनमध्ये आहे.

अनीस इब्राहिम आणि त्याची पत्नी तहसीन हे दोघे त्यांच्या पाच मुलांसह पाकिस्तानमध्ये आहेत. मुलींची नावं शमीम, यास्मिन आणि आना अशी आहेत तर मुलांची नावं इब्राहिम आणि मेहरान अशी आहेत. यापैकी मेहरान आधी पाकिस्तानमध्ये होता आता इंग्लंडची राजधानी लंडन येथे आहे. मुस्तकीन इब्राहिम कासकर आणि त्याची पत्नी सीमा यांना दोन मुली आहेत. शेहर आणि अमिना अशी त्यांची नावं आहेत. शेहरचा निकाह लखनऊ येथे काही वर्षांपूर्वी झाला. अमिना दुबईत वकिली करत आहे. मुस्तकीनला दोन मुलगे पण आहेत. ओवैस आणि हमजा अशी त्यांची नावं आहेत. हुमायून इब्राहिम कासकर याचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्याची पत्नी शाहीन आणि मुले मारिया आणि समाया हे सर्वजण कराचीत आहेत.

दाऊदच्या चार बहिणी

फरजाना तुंगेकर, हसिना पारकर, मुमताज शेख आणि सईदा पारकर या दाऊदच्या बहिणी. यापैकी फरजाना तुंगेकर आणि हसिना पारकर या दोघींचा मृत्यू झाला आहे. दाऊदने भारतातून फरार होताना देशातील कारभार मेव्हणा इब्राहिम पारकर याच्याकडे सोपवला होता. अरुण गवळीच्या टोळी सोबत झालेल्या संघर्षात इब्राहिम पारकरचा मृत्यू झाला. यानंतर हसिना पारकर दाऊदचा भारतातील कारभार हाताळत होती. हसिनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हसिनाच्या दोन मुलांपैकी दानिशचा कार अपघातात मृत्यू झाला तर अलीशाह जीवंत आहे. या व्यतिरिक्त हसिनाला कुशाया आणि उमेरा या दोन मुली आहेत. सईदाचा निकाह हसन मियां सोबत झाला. सईदा आणि हसन या दांपत्याला नजमा, पिंकी, साजिद, समीर ही चार मुले आहेत.

दाऊदचे कुटुंब

दाऊदने दोन निकाह केले. दाऊदची पहिली पत्नी महजबीन. या पत्नीपासून दाऊदला तीन मुलं झाली. यापैकी मोठी मुलगी महरुखचा निकाह पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादच्या मुलासोबत २००६ मध्ये झाला. दाऊदची दुसरी मुलगी महरीनचा निकाह २०१० मध्ये अमेरिकेतील व्यावसायिकाचा मुलगा अयूब याच्यासोबत झाला. दाऊदचा मुलगा मोईन नवाझचा निकाह लंडनमधील व्यावसायिकाच्या मुलीशी… सानियाशी झाला. हा निकाह कराची येथे झाला. दाऊदची दुसरी पत्नी ही पाकिस्तानी पठाण आहे. या पत्नीविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही.


सम्बन्धित सामग्री