मुंबईचा राजा - मुंबईचा राजा, अशी ख्याती असलेला लालबागमधील गणेश गल्लीतील गणपती आहे. मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळमधील कष्टकरी गिरणी कामगारांनी 1928 साली गणेश गल्लीत गणपती बसवण्यास सुरुवात केली.

लालबागचा राजा - नवसाला पावणारा बाप्पा, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आहे. या राजाच्या दर्शनसाठी देशभरातून भक्तांची रांग लागते. स्थानिक व्यापाऱ्यांनी 13 सप्टेंबर 1934 रोजी सध्याच्या लालबाग मार्केटमध्ये गणपती बसवण्यास सुरुवात झाली.

तेजुकाया मेन्शन गणपती - मुंबईतील मानाच्या गणपतींमध्ये तेजुकाया मेन्शन गणपतीचा देखील समावेश आहे. 1947 सालापासून हा गणपती बसवण्यास सुरुवात झाली. हत्तीसारखे गंडस्थळ, सुपाएवढे कान व लंबोदर, अशी २१ फूट उंचीची गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.

जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल - माटुंगा येथील जीएसबी सेवा गणेश मंडळाचा गणपतीही मुंबईतील मानाची आणि सर्वांत धनाढ्य गणपती म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने 1955 मध्ये या गणपतीची स्थापना केली.

केशवजी नाईक चाळ, गिरगाव - मुंबईतील सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी सर्वांत पहिले मंडळ म्हणून गिरगावमधील केशवजी नाईक चाळीच्या गणपती मंडळाकडे पाहिले जाते. आजही अत्यंत पारंपरिक आणि साधेपणाने या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे पालखीतूनच गणपतीचे आगमन होते आणि विसर्जनासाठीही पालखीच वापरली जाते.

परळचा राजा - परळचा राजा हादेखील मुंबईतील एक मानाचा गणपती मानला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी म्हणजे 1947 साली या मंडळाची प्रतिष्ठापना झाली. या गणपतीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा या नावाने ओखळले जाते.