नागापट्टिनम : सरकारी अधिकारी नेमून दिलेली कामेही वेळेवर करत नसल्याचा आणि कर्तव्यात कसूर करत असल्याचा अनुभव अनेकदा येतो. तसेच, मिळणाऱ्या शासकीय पगाराव्यतिरिक्तही टेबलाखालून मिळणाऱ्या 'बिदागी'ची अपेक्षा ठेवणारे सरकारी नोकरदार पावलोपावली आहेत. अशा वाईट अनुभवांमध्ये काही प्रामाणिक अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत खूप सुखद अनुभव देऊन जाते. अशाच एका आयएएस अधिकाऱ्याविषयी जाणून घेऊ. डॉ. जे. राधाकृष्णन असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. तामिळनाडूमध्ये त्सुनामीच्या संकटात त्यांनी एका लहान मुलीला ढिगाऱ्यातून वाचवले.
2004 मध्ये तामिळनाडूमध्ये आलेल्या भयानक त्सुनामीच्या वेळी नागापट्टिनमचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी बचाव आणि मदत कार्याचे नेतृत्व केले. त्यांना एका ढिगाऱ्याजवळ लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि ही मुलगी मीना होती. तिला नंतर अन्नई सत्या या सरकारी बालगृहात ठेवण्यात आले. तीच मुलगी आता शिक्षण पूर्ण करून नर्स झाली आहे आणि तिचे लग्नही झाले आहे. विशेष म्हणजे राधाकृष्णन यांना या मुलीचे लग्न ठरल्याचे समजल्यानंतर ते त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून लग्नाला सहपरिवार उपस्थित राहिले. त्या मुलीला शुभाशीर्वाद देऊन स्वतःच्या हातांनी तिचे लग्नही लावून दिले.
परिवाराची उणीव भासू दिली नाही
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या क्षणांमध्ये वधू-वरांना आपले माता-पिता, पालक, आप्तेष्ट, मित्र, हितचिंतक यांचा आधार वाटतो. त्यांची उपस्थिती हवीहवीशी वाटते. ते नसतील तर त्यांना आणि इतरांनाही चुकल्याचुकल्यासारखे वाटत राहते. त्सुनामीच्या विनाशकारी संकटात आपले कुटुंबीय हरवून बसलेली ही मुलगी मीना नागापट्टिनम जिल्ह्यातील अनाथालयात लहानाची मोठी झाली. मात्र, तिच्या लग्नाला सहपरिवार उपस्थित राहून राधाकृष्णन यांनी तिला या महत्त्वाच्या क्षणी परिवाराची उणीव भासू दिली नाही. मीनाच्या लग्नात आयएएस अधिकारी डॉ. जे. राधाकृष्णन यांनी विशेष भूमिका बजावली.
तिचे मार्गदर्शक बनले
अनाथाश्रमात राहत असताना, मीनाला केवळ सरकारकडून मदत मिळाली नाही तर, राधाकृष्णन आणि त्यांची पत्नी कृतिका यांनीही तिची पूर्ण काळजी घेतली. ते तिचे मार्गदर्शक बनले आणि प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तिला पाठिंबा दिला. मीनाच्या शिक्षणापासून ते परिचारिका बनण्यापर्यंत, राधाकृष्णन नेहमीच तिच्या प्रगतीवर लक्ष ठेवत असत. नागापट्टिनमहून स्थलांतरित झाल्यानंतरही ते मीनाच्या संपर्कात राहिले आणि तिची काळजी घेण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
हेही वाचा - Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?
लग्नाला उपस्थित राहिले
काही वर्षांनंतर, जेव्हा मीनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राधाकृष्णन हा आनंदाचा प्रसंग साजरा करण्यासाठी नागापट्टिनमला पोहोचले. श्री नेल्लुक्कदाई मरीअम्मन मंदिरात झालेल्या लग्न समारंभात त्यांनी स्वतः लक्ष घालून लग्न लावून दिले. मीनासोबत लहानाची मोठी झालेल्या अनाथाश्रमात राहणाऱ्या इतर अनेक मुलांनीही लग्नाला हजेरी लावली.
सोशल मीडियावर लिहिलेली भावनिक पोस्ट
या खास प्रसंगी, राधाकृष्णन यांनी मीनाच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. त्यांनी लिहिले, 'मीना आणि मणिमारनच्या लग्नाला उपस्थित राहणे आनंददायी होते. त्सुनामीनंतरचा आमचा प्रवास नेहमीच आशेने भरलेला राहिला आहे. मीना आणि सौम्या ही याची सर्वात मोठी उदाहरणे आहेत. त्यांनी मीनाचे बालपणीचे फोटो देखील शेअर केले, ज्यामध्ये ती त्यांच्या मांडीवर एका लहान मुलीच्या रूपात दिसत आहे.
हेही वाचा - '2026.. आता मोर्चा पश्चिम बंगालकडे', दिल्लीच्या विजयानंतर भाजप नेत्याचे ममता बॅनर्जींना आव्हान
इंटरनेटवर लाखो लोकांची मने जिंकली
या सत्यकथेने इंटरनेटवर लाखो लोकांची मने जिंकली. नेटिझन्सनी राधाकृष्णन यांच्या उदारतेचे कौतुक केले आणि त्यांना 'खरा नायक', 'मानवतेचे उदाहरण' आणि 'प्रेरणा' असे संबोधले. एकाने लिहिले की, 'तुम्ही जे केले ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे खूप प्रेरणादायी आहे.' दुसऱ्या एकाने लिहिले, 'खरे हिरो कोण आहेत, हे तुम्ही दाखवून दिले. सलाम!'