सध्याच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान बनले आहे. मात्र, त्याचा प्रभाव नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्रात एआयमुळे मोठा बदल होणार असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे, असे मत डीबीएस ग्रुपचे सीईओ पीयूष गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.
पीयूष गुप्ता यांच्या मते, बँकिंग क्षेत्रातील ऑपरेशन्समध्ये एआयचा वापर वाढल्याने पुढील 3 वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या 10 टक्क्यांनी कमी होऊ शकते. डीबीएस ग्रुपमध्ये गेल्या 10 वर्षांत एकही नोकरी कमी झाली नव्हती, पण आता परिस्थिती बदलत आहे. एआय स्वतंत्रपणे विचार करून काम करू शकते आणि नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता बाळगते, त्यामुळे ते पूर्वीच्या कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा वेगळे आणि अधिक प्रभावी ठरते.
हेही वाचा : सिगारेट आणि तंबाखूवरील GST वाढणार? कराचा दर 40% पर्यंत जाण्याची शक्यता!
बँकिंगसह इतर क्षेत्रांवरही परिणाम
बँकिंग क्षेत्रासोबतच इतर व्यवसायांवरही एआयचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. आधी संगणकीकरण आल्याने नोकऱ्यांवर परिणाम झाला होता, मात्र एआय हा बदल आणखी व्यापक आणि वेगवान असेल. अनेक मोठ्या कंपन्या आता आपली कामकाज प्रक्रिया स्वयंचलित करण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे माणसाची गरज कमी होत आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांवर होईल थेट परिणाम?
2016-17 मध्ये डीबीएस बँकेत डिजिटल परिवर्तनाचा प्रभाव 1600 कर्मचाऱ्यांवर झाला होता, पण त्यांची नोकरी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, एआयच्या काळात नोकऱ्या वाचवणे अधिक कठीण होणार आहे, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : 'हा' ग्रुप भारतात करणार 5 हजार कोटींची गुंतवणूक; 15 हजार जणांना मिळणार रोजगार
एआयमुळे बँकिंग क्षेत्र अधिक वेगवान, कार्यक्षम आणि स्वयंचलित होणार आहे. परंतु, त्याचवेळी मानवी नोकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग आणि इतर क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची गरज आहे.