WPL 2025 जेतेपदासाठी मुंबई-दिल्ली भिडणार, कोण जिंकणार?
WPL 2025 स्पर्धेचा फायनल सामना आज रंगणार आहे. गतविजेता मुंबई आणि सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला दिल्लीचा संघ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार असून संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. महिला क्रिकेटच्या या भव्य स्पर्धेच्या फायनलकडं संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या हंगामातही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. नॅट स्किव्हर ब्रेट (493 धावा, 9 बळी) आणि हेली मॅथ्यूज (304 धावा, 17 बळी) या दोन अष्टपैलू खेळाडूंनी आतापर्यंत संघासाठी महत्त्वाचे योगदान दिलं आहे. खास करून मॅथ्यूजच्या फिरकी गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना अडचणीत टाकले आहे. याशिवाय अमेलिया केर हिनेही 16 बळी घेत संघाच्या गोलंदाजीला धार दिली आहे.
मुंबईच्या फलंदाजीतही खोली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत संघाला महत्त्वाच्या विजय मिळवून दिले आहेत. तिच्यासोबत यास्तिका भाटियानेही काही महत्त्वाच्या डावांमध्ये योगदान दिले आहे. मुंबईने ब्रेबॉर्न स्टेडियमवर याआधी अनेक सामने खेळले आहेत. त्यामुळे या मैदानाच्या परिस्थितीचा त्यांना पुरेपूर फायदा मिळू शकतो.
हेही वाचा - चॅम्पियन्स ट्रॉफीत महत्वपूर्ण कामगिरी करूनही हार्दिक पांड्याला फटका
दिल्लीचा पहिल्या जेतेपदासाठी निर्धार
दुसरीकडं दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. मागील दोन WPL हंगामात अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरही त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्त्वाखाली संघाने भक्कम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे.
शेफाली वर्मा (300 धावा) आणि मेग लॅनिंग (263 धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीवर संघाची मदार असेल. शेफालीने पॉवर प्लेमध्ये मोठे फटके खेळून संघाला फास्ट सुरुवात करून दिली आहे. त्याचबरोबर निकी प्रसादने संधी मिळाल्यावर प्रभावी कामगिरी केली आहे. गोलंदाजीत जेस जोनासन आणि अनुभवी शिखा पांडे यांनी प्रत्येकी 11 बळी घेतले असून, त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईचा डाव फोडला होता.
हेही वाचा - दिल्ली कॅपिटल्सचा नवा सेनापती! IPL 2025 मध्ये अक्षर पटेलची निवड
मुंबईला अजून एक ट्रॉफी जिंकायची संधी
WPL स्पर्धेच्या पहिल्या सत्रात मुंबईने दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव केला होता. तर दुसऱ्या सत्रात दिल्लीला बंगळुरूविरुद्ध अंतिम फेरीत 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. आता दिल्ली पुन्हा फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे त्यांना विजेतेपदासाठी जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
स्थळ: ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
वेळ: सायंकाळी 7:30 वाजता
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स-18
लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ सिनेमा, हॉटस्टार