IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे. षटकारासह रोहित शर्माने धावांचा दुष्काळ संपवत झंझावाती शतक झळकावले आहे. रोहित शर्माने अवघ्या 76 चेंडूत 7 षटकार आणि 9 चौकारांसह 101 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माचे हे वनडे क्रिकेटमधील 32 वे शतक आहे. तर, रोहितचे वनडेमधील दुसरे सर्वांत जलद शतक आहे. त्याने एकूण 90 चेंडूंमध्ये 119 झावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. या सामन्यात त्याने राहुल द्रविडसह ख्रिस गेलला मागे टाकले.
रोहितने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. त्याचबरोबर तो आता भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित चौथ्या स्तानावर पोहोचल्यामुळे आता राहुल द्रविडचा विक्रम पाचव्या स्थानावर गेला आहे.
भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याने 18,426 धावा केल्या आहेत. यानंतर विराट कोहली एकदिवसीय सामन्यात 13,906 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सौरव गांगुली यादीत 11,363 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता रोहित शर्मा चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर आता 10940 धावा आहेत. त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविडने 10,889 धावा केल्या आहेत.
हेही वाचा - अमेरिकेत 'या' खेळाडूंना महिलांच्या सामन्यांत खेळता येणार नाही; ट्रम्प सरकारचा निर्णय
भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारे खेळाडू :
18,426 – सचिन तेंडुलकर
13,906 – विराट कोहली
11,363 – सौरव गांगुली
10,940 – रोहित शर्मा
10,889 – राहुल द्रविड
त्याचबरोबर, या सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलच्या नावावर 331 षटकार होते. तर रोहितने या सामन्यात 3 षटकार मारून ख्रिस गेलचा विक्रम मोडला. आता रोहित 333 षटकारांसह एकदिवसीय स्वरूपात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. काही दिवसांत तो शाहिद आफ्रिदीला मागे टाकून पहिल्या स्थावर पोहोचू शकतो.
हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल
रोहित शर्मा डावाच्या सुरूवातीपासूनच चांगल्या फॉर्मात होता. रोहित शर्माने अवघ्या 30 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज रोहितने प्रत्येक गोलंदाजाविरोधात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 338 दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 475 दिवसांनंतर शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय कर्णधार फॉर्मात आला असून ही टीम इंडियासाठी खूप आनंदाची बातमी आहे.