माद्रिद : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने निवृत्तीची घोषणा केली. तो यंदाचा डेव्हिस कप खेळून टेनिसमधून निवृत्त होत आहे. समाजमाध्यमात एक व्हिडीओ प्रसारित करुन नदालने निवृत्तीची घोषणा केली. नदालने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
राफेल नदाल ३८ वर्षांचा आहे. त्याने १४ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा लाल मातीवर खेळवली जाते. या फ्रेंच ओपनमधील विक्रमी कामगिरीमुळे त्याला लाल मातीवरचा राजा म्हणून ओळखले जाते.
डेव्हिस कप स्पर्धेची बाद फेरी १९ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होईल. अंतिम सामना २४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत जोपर्यंत स्पेन खेळेल तोपर्यंत नदाल खेळेल. याआधी २०२३ मध्ये दुखापतीमुळे नदालला फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकावे लागले होते. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये पहिल्याच फेरीत नदालचा पराभव झाला होता.
नदाल फ्रेंच ओपन स्पर्धेतील ११२ सामने जिंकले, त्याचा फ्रेंच ओपनमधील ४ सामन्यात पराभव झाला. नदालने रोलँड गॅरोस स्पर्धा २०२२ मध्ये जिंकली.
राफेल नदालची कामगिरी
२२ ग्रँडस्लॅम : १४ फ्रेंच ओपन, ४ यूएस ओपन, २ ऑस्ट्रेलियन ओपन, २ विम्बल्डन
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकलेले तीन पुरुष टेनिसपटू
- नोवाक जोकोव्हिच : २४ ग्रँडस्लॅम
- राफेल नदाल : २२ ग्रँडस्लॅम
- रॉजर फेडरर : 20 ग्रँडस्लॅम