जोहान्सबर्ग : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी २० मालिका ३ - १ अशी जिंकली. जोहान्सबर्ग येथील सामना भारताने १३५ धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने २० षटकांत १ बाद २८३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने १८.२ षटकांत १४८ धावा केल्या. भारताचा तिलक वर्मा जोहान्सबर्गच्या सामन्याचा सामनावीर आणि टी २० मालिकेचा मालिकावीर झाला. तिलक वर्माने जोहान्सबर्गच्या सामन्यात ४७ चेंडूत १० षटकार आणि ९ चौकार मारत नाबाद १२० धावा केल्या. याआधी तिलक वर्माने सेंच्युरिअनमध्ये झालेल्या सामन्यात ५६ चेंडूत ७ षटकार आणि ८ चौकार मारत नाबाद १०७ धावा केल्या होत्या.
तिलक वर्माची दमदार फलंदाजी
भारताच्या तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी २० मालिकेत चार वेळा फलंदाजी केली. त्याने १४० च्या सरासरीने खेळत २८० धावा केल्या. तिलकने मालिकेत २० षटकार आणि २१ चौकारांची आतषबाजी केली. त्याचा स्ट्राईक रेट १९८.५८ होता.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चार सामन्यांची टी २० मालिका
- शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ - पहिला सामना - किंग्समेड, डरबन - भारताचा ६१ धावांनी विजय
- रविवार १० नोव्हेंबर २०२४ - दुसरा सामना - सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा - दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून विजय
- बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ - तिसरा सामना - सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरिअन - भारताचा ११ धावांनी विजय
- शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४ - चौथा सामना - वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग - भारताचा १३५ धावांनी विजय